या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी परिवर्तन यात्रा घेऊन आलोय -अजित पवार

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची रणधुमाळी उसळायला सुरु झाली असून आज अजित पवार यांनी मोदी सरकारवर चांगालाच निशाणा साधला आहे. सरकारी तिजोरीत पैसे नसताना बुलेट ट्रेन आणायची गरज काय आहे असा सवाल करत अजित पवार यांनी सरकारच्या नाकरते पणावर प्रहार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाचा हि यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे हि यात्रा पालघर येथे आली असता अजित पवार जनतेशी भाषणाद्वारे संवाद साधत होते.

भाजपला घरी बसवण्यासाठी आम्ही इथपर्यंत परिवर्तन यात्रा घेऊन आलो आहे. या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे. कारण या सरकारच्या कार्यकाळात गोर गरीब शेतकऱ्यांचा जीव जातो आहे. या शेतकऱ्यांच्या पाहणी साठी केंद्राने पथक पाठवले तर ते पथक घोड्यावरून पाहणी करून दिल्लीला निघून गेले. पथकाने पहाणी करून अनेक दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्यात आली नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

या सरकारने शेतकऱ्यासाठी काहीच केलेले नाही. शेतकऱ्यांसाठी जे शरद पवार यांनी केले ते हे सरकार करू शकले नाही असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. तर आदिवासी आश्रम शाळेत बनावट वस्तू वाटून ते त्या वस्तूच्या पुरवठ्यासाठी ठरवण्यात आलेल्या पैशात अपहार करत आहेत असा घणाघाती आरोप अजित पवार यांनी भाजप सरकारवर लावला आहे.

राज्यात नोकर भरती केली जात नाही. राज्यातील दोन लाख जागा या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. ‘मोठ घर पोकळ वासा, वारा जाई भसा-भसा,’ अशा अस्सल ग्रामीण म्हणीचा उच्चार करून अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कार्यप्रणाली वर टीका केली आहे. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे.पण ते पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. ३ हजार कोटी रुपयांचा खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधला, त्या पुतळ्याची खरच गरज होती का. लोकांना फक्त भावनिक मुद्द्यात फसवण्याचे उद्योग भाजप सरकारच्या वतीने केले जातात असे अजित पवार म्हणाले आहेत.
गोमांसाच्या संशयावरून गरीब मुस्लिम लोकांना मारून टाकतात आणि त्यानंतर तपासात हे सांगतात कि ज्याचा प्राण घेण्यात आला त्याच्या जवळ गोमांस नव्हतेच असा किती अन्याय करणार आहेत असे अजित पवार दादरी प्रकरणाचा उल्लेख करून म्हणाले.