एसपी श्रीधरांच्या संकल्पनेतून दामिनी पथकाला स्कुटी वाटप 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे. दामिनी पथकाच्या कार्याला आणखीन गती देण्यासाठी दामिनी पथकाला लोकसहभागातून १२ नवीन स्कुटी देण्यात आल्या. यावेळी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक मृत्याल, जालना येथील पोलीस अधिक्षक  एस. चैतन्य, उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक  ए. राजा आणि औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस आधिक्षक पी. आर. सिंह, अप्पर पोलीस आधिक्षक वैभव कलुबर्बे, अजित बोरा, डीवायएसपी सुधीर खिरडकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत राज्याच्या उप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे म्हणाल्या की, ‘बीड पोलिसांनी राबवलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. त्यात दुचाकी, कॅमेऱ्यामुळे आणखी भर पडली आहे. त्याबद्दल मी आयजी आणि एसपींचे स्वागत करते. असे उपक्रम इतरही ठिकाणी राबवले जावेत, यासाठी प्रयत्न करू.’

महिलांसह मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दामिनी पथकाची स्थापना केली. आतापर्यंत दामिनी पथक शासकीय चारचाकी वाहनाने पेट्रोलिंग करत होते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत होत्या. आता या दुचाकींवरून दामिनी पथक आता गस्त घालणार आहे. रोडरोमियोंचा बंदोबस्त व्हावा, मुलींमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक दामिनी पथकाला एक दुचाकी देण्याची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी व्यक्त केली. याला बीडकरांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रत्येक तालुक्यातून एक दुचाकी पथकाला भेट देण्यात आली.