आंबेडकर आणि ओवैसींचा विदर्भ दौरा उद्यापासून सुरु

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. या आघाडीत भारिप बहुजन महासंघ येण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता भारिप बहुजन संघाचा यात समावेश शक्य नाही हे समोर येत आहे.

मात्र प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे एमआयएमशी आघाडी केल्याने काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता एमआयएम आणि बहुजन महासंघ या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भाचा संयुक्त दौरा करणार आहेत. त्यामुळे यांची आघाडी विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन्ही मतदारसंघांमध्ये  काँग्रेसपुढे संकट उभे करू शकते.

विदर्भातील सर्व मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथील मतदारसंघांचा निकाल या मतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या संयुक्त दौऱ्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात निश्‍चितपणे चिंतेचे वातावरण राहू शकते.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असासुद्दीन ओवैसी यांच्या संयुक्त दौऱ्याला 16 जानेवारीपासून यवतमाळ येथून सुरू होत आहे. त्यामुळे यांच्या संयुक्त दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढील निवडणुकीचे निकाल अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे या दोघांचा हा दौरा लक्षणीय ठरणार आहे.