महानायकाकडून शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर अनेकांनी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबास शक्य तशी मदत जाहीर करत आहेत. अशातच बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन हेही दानशूरपणा दाखवत मदतीसाठी सरसावले आहेत. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या प्रत्येक कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ४४ जवान हुतात्मा झाले. यानंतर देशभरातून याचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात आला. सर्वसामान्यासहीत बाॅलीवूडमधूनही याचा निषेध होताना दिसून आला. अनेकांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतही जाहीर केली आहे. अशाताच महानायक अमिताभ बच्चन जवानांच्या कुटुबीयांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

अमिताभ यांच्या प्रवक्त्याने याविषयी माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगतिले की, ‘अमिताभजी हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देणार आहेत. त्यासाठी ते योग्य प्रक्रिया शोधत आहेत.’

गुरुवारी (दि- १४ फेब्रवारी) काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला दहशतवादी आदिल अहमद डारने घडवून आणला होता. स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल ३५० किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज २ ते ३ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.  गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.