‘निषेध करण्याची संधी मागून मिळत नसते ती हक्कांनीच मिळवावी लागते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निषेध करण्यांची संधी मागून मिळत नसते. ती हक्कानीच मिळवावी लागते, असे सांगत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपण भाषणात सांगितलेली सर्व माहिती एनजीएमए चे बहुलकरांनीच सांगितल्याचा बॉम्बगोळा फोडला आहे. आपल्या औचित्यभंगाला त्यांनी पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर पु. ल.यांनी सरकारवर केलेल्या टिकेची जोड देत कणाहीन जगण्यापेक्षा तथाकथित औचित्यभंगाचा ठपका घेऊन जगणे मी उचित मानतो, असे सांगत त्यांनी बहुलकरांना चपराक लगावली आहे.

बहुलकर यांनी केलेल्या खुलाशाला उत्तर देताना अमोल पालेकर यांनी आज एक पत्र प्रसिद्धीला दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी शुक्रवारी एनजीएमए संबंधित प्रंश्नांना वाचा फोडल्यावर लगेच रविवारी सांस्कृतिक मंत्रालयाकडून सोबतचा खुलासा करण्यात आला. पूर्वीच्या समित्यांनी केलेल्या शिफारसी (ज्या मुंबई एनजीएमए करीत डिसेंबर २०१९ पर्यंत मानल्या जातील) आणि प्रस्तावांनुसार कलाकारांची प्रदर्शने भरविली जातील. थोडक्यात काय तर दिल्लीहून एकतर्फी घेतला गेलेला निर्णय मागे घेतला आहे. तसेच सरकारने हे ही मान्य केले आहे की, कलाकारांकडून आलेल्या सूचनांचा एनजीएमए बारकाईने विचार करीत आहे आणि सर्व संबंधित गटांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. यातच मी उठवलेला आवाज हा औचित्यपूर्ण होता की नाही हे समजून येते.
बहुलकरांचा आक्षेप, मी त्या व्यासपीठावर, त्या उत्सवी प्रसंगी हे मुद्दे उठवले याला आहे. असे ते वारंवार सांगत आहेत. त्यांनी हे मुद्दे स्वत:च गेले तीन महिने लावून धरून संपूर्ण कलाजगतासमोर आणले असते तर मला हे बोलावेच लागले नसते. व्यक्तिश: त्यांनीच हे सारे तपशील मला सांगितले होते. या वर्षातील ठरलेली प्रदर्शने रद्द करण्यात आली आहे. त्याविषयी नाराजीही व्यक्त केली होती. त्यांनी परिस्थितीपुढे नमते घेतलेले मला स्वच्छ दिसत होते. जसे इतरही अनेक कलाकारांनी आपापसात, कुजबुजत गप्प राहणे पसंत केले.
तसेच याबाबत अमोल पालेकर पुढे म्हणतात, की मला त्या दिवशी माझे भाषण पूर्ण करु दिले असते तर हे मुद्दे केवळ शंभर लोकांपर्यंत पोहोचले असते. आणि मी माझ्या कायदेशीर मार्गांनी त्याची पुढील दाद सरकारकडे आणि वेळ पडल्यास कोर्टापुढे मागितली असती. निषेध करण्याचे धाडस स्वत:त नाही आणि जो संयतपणे मुद्दे उठवतो आहे. त्याचीही मुस्कटदाबी करायची ही खरी दुदैवाची बाब आहे. माझ्या भाषणानंतर ही तुम्ही माझ्यावर औचित्यभंगाची जोरकस टिका करु शकला असतातच की.

बहुलकर म्हणतात, त्या प्रमाणे बर्व्यांना माझे आवाज उठवणे पटले नसते, तर मी त्यांच्याशीही अत्यंत आदराने आणि प्रेमाने वाद घातला असता. त्यांनी तो ऐकून घेतला असता. तुमच्यासारखी मुस्कटदाबी केली नसती याची मला खात्री आहे. निषेघ करण्याची संधी मागून मिळत नसते, ती हक्कांनी मिळवावी लागते. हेही मी तितक्याच ठामणे सांगितले असते.

हा प्रसंग घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पु. ल. देशपांडेंवरचा भाग २ सिनेमा बघितला. तिथे हजर असलेल्या एकाही मराठी कलाकाराने वा प्रेक्षकांनी आदल्या दिवशी झालेल्या प्रसंगाविषयी मला विचारले नाही किंवा त्यांचे मत व्यक्त केले नाही. जसे काही सगळे आलबेल आहे!  Ironically सिनेमा संपतो तो पु.ल.यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणाने, उत्सवी प्रसंग असूनही लोकशाही मार्गाने निवडून येणारे ठोकशाहीची भाषा करीत आहेत याच्या मला किती यातना होत असतील, हा हेलावणारा प्रश्न पु.ल.यांनी आवर्जुन विचारला. हा प्रश्न विचारायला पु.ल. कचरले नाहीत. त्यांनी पुरस्कार स्वीकारला पण त्या अनुषंगाने अपेक्षित असणारा मिंधेपणा स्वीकारला नाही.

कणाहीन जगण्यापेक्षा तथाकथित औचित्यभंगाचा ठपका घेऊन जगणे मी उचित मानतो. असे अमोल पालेकर यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे.