….अाणि विद्यार्थांनी शाळेतीलच कॉम्प्युटर चोरले

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन- संगणकावर गेम खेळण्याच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांनी दोन संगणक संच शिक्षण घेत असलेल्या शाळेतूनच लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने दिघी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार तीन विद्यार्थाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना तीन आठवड्या पूर्वी पिंपरी-चिंचवडच्या यशवंत चव्हाण प्राथमिक विद्यालयात घडली आहे. विद्यार्थाना बुधवारी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थाना संगणकावर गेम खेळण्याचे आकर्षण होते. त्याचमुळे त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारत संगणक लंपास केले होते.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आठवड्यांपूर्वी दोन माजी विद्यार्थी आणि यशवंत चव्हाण प्राथमिक विद्यालयात इयत्ता ९ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने संगणक लॅब मधून दोन संगणक संच चोरले. शनिवारी रात्री उशिरा दोन माजी आणि ९ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने दरवाजा तोडून आत प्रवेश करत दोन संगणक संच लंपास केले. याप्रकरणी त्यांना बुधवारी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलीस चौकशीत त्यांनी संगणकावर गेम खेळण्याच्या हव्यासापोटी चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक संगणक माजी विद्यार्थ्यांच्या घरी होता तर दुसरा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांचा घरी होता. घरच्यांनी याविषयी जाब विचारला असता दोन हजार रुपयांना संगणक विकत घेतल्याचे पटवून दिले होते. माजी दोन विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेले असून हे सर्व जण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडील दोन संगणक पोलिसांनी जप्त केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांच्या टीम ने केली आहे.