लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर अण्णांनी उत्तम अभिनय केला : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकपाल नियुक्तीच्या मुख्य मागणीसह अण्णांच्या अन्य मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवून लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंच्या उपोषणाची खिल्ली उडवली आहे. अण्णांचे उपोषण हे स्क्रीप्टेड असल्याचा आरोपच आव्हाड यांनी केला आहे. अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांचे आंदोलन स्क्रीप्टेड असून त्यांनी उत्तम अभिनय केल्यांच म्हटलं आहे.

सन २०१४ ते २०१९ या कालावधी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली, पण अण्णा बोलले नाहीत. आता, त्यांना स्क्रीप्ट लिहून दिली, त्यांनी उत्तम अभिनय केला आणि आपण मुर्खासारखे चर्चा करतो, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे. त्यामुळे आता, अजित पवार पुन्हा एकदा अण्णांची माफी मागणार की जितेंद्र आव्हाड यांना खडसावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपने अण्णांच्या आंदोलनाची प्रारंभी दखल घेतली नाही. त्यामुळे या उपोषणाची नेमकी सांगता कशी होणार, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आणि अण्णांनाही लोकपाल, तसेच सर्व राज्यांत लोकायुक्‍तांच्या नेमणुका याबरोबरच कृषिमूल्य आयोगाच्या स्थापनेबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मिळाले आहे. मात्र, त्यानंतरही लोकपाल व लोकायुक्‍त यांच्या नेमणुका होतील की नाही, यावर गेली सात-आठ वर्षे असलेले  प्रश्‍नचिन्ह कायमच आहे.