‘अन्यथा आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार’ : अण्णा हजारे 

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन – लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवस उपोषण केलं. अखेर मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री यांच्या चर्चेला यश आल्याचं दिसलं.  लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्याचं जाहीरपणे सरकारने सांगितल्यानंतर अण्णांनी उपोषण सोडलं. मात्र यानंतर आता अण्णा लिखित पत्रावर अडून बसल्याचे दिसत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचे दिसले परंतु केंद्रीय कृषि कार्यालयाकडून अजूनही याबाबत अधिकृत पत्र मिळाले नाही असे अण्णांनी सांगितले. शिवाय केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. इतकेच नाही तर, दोन दिवसानंतर मौन आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. जर सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर, निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अण्णांनी दिल्याचे दिसून आले.

यावेळीच अण्णांनी २०१३ च्या आंदोलनात कार्यरत असलेल्या तत्कालीन ‘टीम अण्णा’वर देखील सडकून टीका केल्याचे दिसून आले. दिल्ली येथे २०१३ मध्ये अण्णांचे आंदोलन झाले होते. या आंदोनात अरविंद केजरीवाल, किरण बेदी सहभागी होते. टीम अण्णावर अण्णांनी जोरदार टीका केली. आंदोलनानंतर टीम अण्णामध्ये असलेल्या काही लोकांच्या मनात ‘मुख्यमंत्री’ तर काहींच्या डोक्यात ‘राज्यपाल’ शिरला, असे म्हणत अण्णांनी चांगलाच टोला लगावला आहे.

आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मंगळवारी अण्णांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलं. अण्णा हजारे यांनी सात दिवसांच्या उपोषणानंतर आंदोलन मागे घेतले. सरकारकडून उपोषण सोडताना लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्याचं केल्याचं सांगण्यात आलं.