ज्याच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायचा , त्याला जनतेनं पंतप्रधान बनवलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेनं देश सोपवला आहे असे म्हणत तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं आहे.

पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी याबाबतते ट्विट केले आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. मालवीयनं लिहिलं आहे की, ‘विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणं हा अभिशाप आहे काय ?’ असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान मोदी सरकारविरोधात चंद्राबाबू नायडू हे दिल्लीतील आंध्र भवन येथे एकदिवसीय उपोषणावर बसले आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. मोदी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे वागावे असे त्यांना अपेक्षित आहे. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशातील रॅली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली. चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे.

‘एकट्यावर हल्ला करणे थांबवा’

यावेळी बोलताना नायडू म्हणाले की, “जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहीत आहे. हा आंध्र प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल, आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा” असा शब्दांत चंद्राबाबू नायडूंनी इशारा दिला आहे.