राजकीय

पराभव दिसला की माणूस चवताळतो, मग काहीही बरळतो : खोतकर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. खरंतर एखाद्या माणसाला आपला पराभव दिसला की माणूस चवताळतो, मग त्यातून काहीही बरळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय, असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं आहे.

आपले कोण, परके कोण, हे समजायला दानवे तयार नाहीत. आम्ही एवढी वर्षे त्यांच्यासाठी मदतच करीत गेलो आहोत. एवढं करुनही त्यांना कळत नसेल,तर निश्चितपणे ही निवडणूक आणि निवडणुकीचे वातावरण त्यांना कळून चुकलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली दिसते. त्यामुळे ते काहीपण बरळायला लागले आहेत, अशी टीका अर्जुन खोतकरांनी केली आहे.

निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत तसतश्या नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्याचाच हा एक नमुना आहे. रावसाहेब दानवेंनी जालन्यात एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर गावराण भाषेत चौफेर टीका केली होती. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढा पैसा मी आणू शकतो. पण हे सगळं काहींच्या डोळ्यात येतं. असं चाललं तर रावसाहेब दानवे लई मोठा होईल. आवो चोरो बांधे भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा. पहले याला पाडा म्हणतात, काहीही करा याला पाडा, रावसाहेब दानवेंना. तिकून तो सत्तार येऊ राहिला. इकडून तो खोतकर येऊ राहिला. रावसाहेब दानवेंना पाडा म्हणतात, असं म्हणत त्यांनी खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेचा अर्जुन खोतकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान, दोघांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यातील हाडवैर पुन्हा वर आलं आहे. आता लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर उतरण्याची शक्यता निर्माण झाल्याने अर्जुन खोतकरांनीही टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे दानवे विरुद्ध खोतकर असा अटीतटीचा सामना जालनाकरांना पाहायला मिळत आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या