चोरट्याने पोलिसांना घडवली राज्यांची भ्रमंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अत्तराच्या दुकानातून २२ लाखांचे सुगंधित आणि दुर्मिळ लाकूड चोरून नेणाऱ्या चोरट्यांने स्वत:बरोबर पोलिसांना चार राज्यांची भ्रमंती घडवली. मुंबई पोलिसांनी चोरट्याचा चार राज्यात पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या.

रशिद उद्दीन मतीउर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरलेले २२ लाखांचे सुगंधित लाकूड जप्त करण्यात आले आहे. हा प्रकार पायधुनी चकला स्ट्रीट येथील अत्तराच्या दुकाना १ डिसेंबर रोजी घडला होता. चोरट्याने पायधुनी येथील अत्तराच्या दुकानातून १ डिसेंबर रोजी २१ किलो अगरवूड चोरुन नेले.

दुकानामध्ये ओळखीच्या व्यक्तीने चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बाधंला. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेणे अवघड झाले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लीलाधर पाटील आणि प्रवीण फडतरे यांच्या पथकाने चोराचा शोध सुरू केला.

पथकाने शिवडी परिसरात चोरट्याचा शोध घेत असताना आरोपी रशिद हा कर्नाटकमध्ये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक रशिदच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण त्याला लागली. त्याने कर्नाटकातून कोलकत्ता येथे पळून गेला. पोलिसांनी त्याचा माग काढत कोलकत्ता येथे त्याचा शोध घेतला. तो एका मित्राकडे राहत असल्याचे समजले. पोलीस मित्राच्या घरी पोहचले. रशिदने या ठिकाणी देखील पोलिसांना हुलकावणी दिली. आता रशिदला पकडे पोलिसांसमोर आव्हान होते.

मणिपूर, इंफाळ या भागात काही दिवस काढल्यानांतर राशिद सध्या आसामच्या नगांव जिल्ह्यात असल्याची नवी माहिती पोलिसांच्या हाती लागली. काही झाले तरी राशिदला पकडायचेच, असे ठरवून पोलिसांचे एक पथक आसाममध्ये गेले. त्याचवेळी दुसरे पथक शिवडीमध्ये सापळा लावून बसले होते. आसामधून राशिद थेट शिवडीत आला आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकला. एक महिना पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राशिद या दुकानात कामाला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती. महागड्या अगरवूडला अत्तर क्षेत्रात प्रचंड मागणी असल्याचे त्याला माहिती होते. म्हणूनच त्याने हे लाकूड चोरल्याची माहिती चौकशीत दिली.