आर.आर.आबांच्या स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन ; भाजपच्या ‘या’ नेत्याचे धाडसी विधान

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन-आर. आर. आबांचे स्मारक 16 मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल व तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. व आर. आर. यांच्यामुळेच अशी मी धाडसी विधाने करु शकतो अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. येथील मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतीगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षातील मान्यवर राजकीय नेते मंडळी यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली. सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून स्मारक होणार आहे. आमदार सुमन पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आर. आर. यांच्यासोबतच्या विधीमंडळातील अनेक आठवणी श्रोत्यांसमोर उघड करताना मुनगंटीवार यांनी त्यांच्यासोबतचे आपली मैत्रीही उलगडली. ते म्हणाले, मी नवखा आमदार म्हणून विधानसभेच्या ग्रंथालयात गेल्यानंतर गेल्या पाच वर्षातील कुणाची भाषणे मी वाचू असा प्रश्‍न मी ग्रंथपाल बाबा वाघमारे यांना केला. त्यांनी मला आर. आर. यांचे नाव सांगितले. त्याअर्थाने आर. आर. माझ्यासाठी प्रेरणा होते. युतीचा आमदार म्हणून 1995 च्या विधानसभेत पहिले भाषण केले. त्यानंतर “तुम्ही चांगले भाषण केलेत. तुमचा भविष्यकाळ उज्वल आहे.’ असे पत्र त्यांनी मला आवर्जून पाठवले. एक संवेदनशील राजकारणी म्हणून मी त्यांना अनुभवत होतो.

9 डिसेंबर 2009 रोजी विधानसभेत मी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या व्यथांवर बोलताना केवळ भाषणे करून नक्षलवाद संपणार नाही. असे मी आर. आर. यांच्यावर टिका केली. या भाषणात मी त्यांना गडचिरोलीचे पालकमंत्री व्हा असे आव्हान दिले. एका विरोधी आमदाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी विधीमंडळात आपण पालकमंत्री होत आहोत अशी घोषणा केली. गडचिरोलीच्या विकासासाठी ते मंत्रीमंडळ बैठकीत कायम आग्रही राहिले. त्यासाठी त्यांनी अंगावर वाद ओढवून घेतले.

डान्सबार बंदीचा निर्णय असो वा स्वच्छता अभियानाचा. आर. आर. यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. ते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही आमच्या पक्षात हवे होता. मीही त्यांनी माझ्या पक्षात येण्याचे आवाहन करायचो. हे खरे होते की, त्यांनी कधीही पक्ष बदलला नसता आणि मी देखील दिल्लीने कितीही अन्याय केला तरी पक्ष बदलणार नाही. कोणताच पक्ष वाईट नाही, मात्र प्रत्येक पक्षात चांगल्या माणसांसाठी जागा मात्र असली पाहिजे. राजकारणाबद्दलचा समाजाचा झालेला दृष्टीकोन बदलण्यासाठी ते झाले पाहिजे.

अजित पवार यांनीही आर.आर यांच्या कर्तृत्वाचा पट मांडताना त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हाणी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले,”” विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आर.आर.पाटील यांच्यासारखे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते अल्पकाळात निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले.’

जयंत पाटील म्हणाले,आर. आर. यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरवात केली. त्याचवेळी त्यांनी तासगाव मतदारसंघावर छाप टाकली. विरोधात असताना त्यांच्याकडे कधी विधानसभेत पद नव्हते मात्र तेच विरोधी पक्षनेते होते. सत्तेत राहूनही त्यांनी नेहमीच जनतेचीच भूमिका मांडली. सत्तेतही त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे लोकांसाठी सोने केले. त्यांच्या निधनाने राष्टवादी कॉंग्रेसची मोठी हानी झाली याचे मोठे शल्य मला आहे.’

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी प्रास्ताविक केले. मी स्वता जातीने लक्ष घालून अठरा महिन्यात स्मारकाचे काम पुर्ण करणारच अशी ग्वाही दिली.

खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर यांची भाषणे झाली. आमदार सुमन पाटील यांनी शासनाने स्मारक उभारणीसाठी राजकारणनिरपेक्षपणे दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, नीता केळकर शैलजा पाटील विविध पक्षीय नेते उपस्थित होते.