रसायनीत वायू गळतीने शेकडो माकडे, पक्षी गतप्राण

पनवेल :  पोलीसनामा ऑनलाइन – रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली होती. बुधवारी रात्री ९़.४५ वाजताच्या सुमारास ही घडना घडली असून, या वायुगळतीमुळे २८ वानरांसह ४८ माकडे मृत्युमुखी पडली आहेत. तर १०० हून अधिक पक्षी गतप्राण झाले आहेत. कंपनीने या प्राण्याची परस्पर विल्हेवाट लावली असून हे प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल (एचओसी) कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचे काम करते. १३ डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री ९. ४५ वाजताच्या सुमारास या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला. तसेच या वायुगळतीमुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले होते. त्यानंतर कंपनी बंद करण्यात आली असून, सध्या तरी कंपनीचा एक प्लांट सुरू आहे.

२८ वानरांसह ४८ मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा एचओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली आहे. या घटनेनं प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रसायनीच्या जवळपास कनार्ळा अभयारण्य असल्याने या वायुगळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.