क्राईम स्टोरी

पोलिसांच्या उपस्थितीत ‘त्या’ संशयित आरोपीचे मैत्रिणीसोबत स्नेहभोजन

अलिबाग : पोलीसनामा पोलीसनामा – सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी महेश फळणीकर याला न्यायालयीन कामकाजासाठी अलिबाग न्यायालयात नेले होते. यावेळी तो आपल्या मैत्रिणीसोबत एका पार्किंग शेडमध्ये स्नेहभोजन करत होता, तर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना निवांत मोकळीकता दिली होती. ही चित्रफीत व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

महेश फळणीकरला अलिबाग न्यायालयात हजर करून पुन्हा कारागृहात हजर करण्यास नेत असताना एका शेडमध्ये त्याच्या मैत्रिणीने आणलेला डबा दोघांनी मिळून खाल्ला. त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर ते गप्पा मारत बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसते, तर पोलीस पार्टीचे दोन कर्मचारी तेथून जवळच एका दुचाकीवर निवांत बसून गप्पा मारत होते. महेश फळणीकर व त्याच्या मैत्रिणीमधील हे स्नेहभोजन चर्चेचा विषय ठरत आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणाच्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलीस अशा प्रकारची व्हीआयपी वागणूक देत असल्याचे पाहून राजू गोरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ पाहून वरिष्ठ कोणती कारवाई करतात, ते पाहावे लागणार आहे.

बिद्रे खून प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी म्हणून महेश फळणीकर याच्याकडे पाहिले जाते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून कारागृहात बंदिस्त आहे. ही हत्या कशी घडली, याची माहिती त्याने तपास यंत्रणेला दिली आहे. त्याच्या जबाबामुळे मुख्य आरोपींना शिक्षा होण्यास मदत होणार आहे. अटक असलेल्या आरोपीला कारागृहातून बाहेर काढल्यापासून न्यायालयात हजर करून पुन्हा कारागृहात हजर करताना पोलीस पार्टीला काही नियम व अटी घातल्या आहेत. या अटींचे उल्लंघन केले तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागते.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या