सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) ५ हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – दाखल गुन्ह्यात जामीन व मदतीसाठी ५ हजाराची लाच तक्रारदारांकडून घेताना चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप कचरूसिंग ठाकूर (रा. संभाजीनगर, प्रियर्दिशनी कॉलनी, जालना) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.१५) जुना जालना, नूतन वसाहत येथील आनंद हॉटेलमध्ये करण्यात आली.
तक्रारदार यांच्या वडील, भाऊ, काका यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. वडील, भाऊ, काका व नातेवाईकांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व पीसीआर न घेण्याकरिता व अटकेत असताना मारहाण न करण्यासाठी एका माणसाचे २ हजार याप्रमाणे १८ हजार रुपयांची लाच सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप ठाकूर यांनी मागितली. त्यावेळी तक्रारदारांनी १० हजार रुपये दिले असताना देखील उर्वरित ५ हजारासाठी वडील, भाऊ, नातेवाईक यांना त्रास देणे सुरू ठेवले व लाचेची मागणी केली. तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांच्या लाचेची पडताळणी करण्यात आली. त्यावरून १५ नोव्हेंबर रोजी नूतन वसाहत, जालना येथील आनंद हॉटेलमध्ये लाचेचा सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप ठाकूर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

२ लाखांचे लाच प्रकरण : गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवालदाराला पुण्यात अटक 

ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रवींद्र डी. निकाळजे, पोलीस निरीक्षक आ. वि. काशिद, पोलीस निरीक्षक चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दैंडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रवीण खंदारे यांनी केली.