देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या युवा धावपटूची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  १०० आणि २०० मीटर वेगवान शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व केलेला १८ वर्षांचा युवा धावपटू पालिंदर चौधरी याने जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील स्वत:च्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. नेहरु स्टेडियममधील वसतीगृहातील त्याच्या खोलीतील पंख्याला चौधरीने गळफास घेतल्याचे मंगळवारी रात्री लक्षात आल्याबरोबरच त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी त्याचे निधन झाले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या प्रकाराच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. २०१७ साली युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौधरीने रिलेचे सुवर्ण जिंकले होते. याशिवाय युवा विश्व चॅम्पियनशिपमध्येही तो सहभागी झाला होता. चौधरीला सफदरजंग इस्पितळात हलविण्यात येत असताना त्याचे ‘ब्रेन डेड’झाल्याचे सांगितले जाते.

याबाबत साईच्या संचालक नीलम कपूर यांनी म्हटले की,  घटना आमच्या परिसरात झाल्याने विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘साई’चे सचिव स्वर्णसिंग छाब्रा यांच्या नेतृत्वाखालील समिती आठवडाभरात या घटनेचा अहवाल सादर करेल, असे स्पष्ट करण्यात आले असून कुठलीही चिठ्ठी चौधरीजवळ मिळाली नसल्याने या घटनेमागील कारणही स्पष्ट नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

चिंताजनक… दररोज २ हजार शेतकरी शेती सोडून रोजगाराकडे वळतात : पी. साईनाथ 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी याचे त्याच्या वडिलांबरोबर आर्थिक बाबींवरुन मंगळवारी मोबाईलवर वाद झाला होता. त्यानंतर त्याची बहिण सायंकाळी त्याला भेटायला आली. त्याने पालिंदरला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला धमकी दिल्याने त्यानंतर त्याने आपल्या बहिणीच्या समोर पाऊल उचलले. तो गळफास घेत असल्याचे दिसताच तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून साई चे तेथील कर्मचारी धावत त्याच्या खोलीत पोहचले. कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरविले व हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

पालिंदरचे वडील महेश पाल यांनी सांगितले की त्याला पैशाची गरज होती. मी त्याला आश्वासन दिले की मी पैसे देईन, नंतर काय झाले हे मला माहिती नाही. स्टेडियममध्ये लोकांविरुद्ध मला तक्रार नाही.
स्टेडियममधील त्यांचे सहकारी प्रशिक्षक आणि कर्मचारी घाबरले कारण पालिंदरने दिवसाच्या दरम्यान प्रशिक्षण घेत असताना निराशाची कोणतीही लक्षणे दर्शविली नाहीत. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांने आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि एक तासानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सांगितले.
पालिंदर हा नोव्हेंबर २०१६ पासून जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या वसतिगृहात राहत होता. तो १०० आणि २०० मीटर रेससाठी प्रशिक्षण घेत होता. बँकॉकमधील २०१७ मधील आशियाई युवा चॅम्पियनशिपसाठी त्यांची निवड झाली आणि रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. गेल्या जुलैमध्ये त्याने जागतिक युवा चँपियनशिपमध्ये भाग घेतला होता.