तरुणावर तलवारीने सपासप वार करुन खूनाचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन –सांगवी येथील डायनासोर गार्डन चौकात मित्राची मदत करायला निघालेल्या एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार मंगळवारी (दि. 15) रात्री आठच्या सुमारास घडला.

रेवणसिद्ध इरण्णा माडगूळ (21, रा. वरूण हॉटेल समोर, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री माडगूळ याचा मित्र वैभव याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामुळे वैभव याने माडगूळ याला पिंपळे गुरव मधील मल्हार सोसायटी येथे बोलावले.

माडगूळ मल्हार सोसायटी येथे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जात होता. पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनसमोर आला असता अज्ञात आरोपींनी त्यांची पल्सर दुचाकी आडवी लावली. पल्सरवर मागे बसलेल्या एकाने कोयत्याने माडगूळच्या डोक्यात वार केला. तसेच आणखी एका ऍक्टिवावरून आलेल्या दोघांनी तलवारीने माडगूळच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तपास सांगवी पोलीस  करीत आहेत.