कारवाई न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास (PSI) जीवे मारण्याचा प्रयत्न

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – हॉटेल मालकावर कारवाई करण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी दुचाकी पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार रहिमतपूर येथे शनिवारी रात्री अकरा वाजता घडला होता.

रणजित अप्पासाहेब क्षीरसागर (वय २९), नितीन किसन भोसले (३९, दोघे रा. धामणेर, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रहिमतपूरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बाळनाथ जगदाळे (२९, मूळ रा. हिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार, रहिमतपूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हजेरी संपल्यानंतर जगदाळे घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोघे पोलीस ठाण्यात आले. त्या दोघांनी तुम्ही कोण आहात ? तुमचा ड्रेस कुठे आहे, तुमचा बक्कल नंबर काय ? असे विचारत, आम्हाला हॉटेलमालकाने खोटे बिल दिले आहे. तुम्ही आता लगेच आमच्याबरोबर चला. नाही तर तुम्हाला खांद्यावरून घेऊन जातो, असे सांगितले.

त्या दोघांना जगदाळे यांनी आधी तक्रार द्या, त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यानी दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. दरम्यान, चांदणी चौकात लोकांची गर्दी झाली असल्याची माहिती मिळताच जगदाळे दुचाकीवरून ठाण्याच्या पाठीमागील असलेल्या गेटमधून बाहेर पडले.

जगदाळे दुचाकीवरून चांदणी चौकाकडे जात असताना रणजित क्षीरसागर व नितीन भोसले हे पाठीमागून भरधाव वेगात दुचाकी वरून आले. त्यांनी जगदाळे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीने जोरात ठोकर दिली. यात जगदाळे गंभीर जखमी होऊन त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर त्या दोघांनी जगदाळे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.

याप्रकरणी रात्री उशिरा रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सकाळी दोघांना अटक करून कोरेगाव न्यायालयात हजर केले. दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ करीत आहेत.