खेड पोलिसांना नगर जिल्ह्यात बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन –  शिरुर- बेलवंडी रस्त्यावर साईड न दिल्याने झालेल्या वादात खेड पोलिसांना मारहाण करुन त्यांचा गळा पकडून जीवे मारण्याचा प्रयत्न नगर जिल्ह्यातील बेलवंडी येथे झाला. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून १६ जणांना अटक केली आहे.

याबाबत बेलवंडी पोलिसांनी सांगितले की, खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी एका गुन्ह्याच्या तपासासाठी कर्जत येथे खासगी कारने गुरुवारी दुपारी जात होते. शिंदेवाडी येथे रस्त्याचे काम सुरु आहे.  बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवारात दुपारी चारच्या सुमारास पोलिसांच्या गाडीपुढे वीटभट्टीसाठी माती वाहून नेणारा डंपर जात होता. सिंगल रस्ता असल्याने डंपरचालक पोलिसांच्या कारला पुढे जाण्यास जागा देत नव्हता. कारने अनेक वेळा हॉर्न वाजूनही त्याने साईड दिली नाही. तेव्हा रस्त्याच्या खाली उतरुन त्यांनी डंपरला ओव्हरटेक केले. व पुढे गाडी थांबवून डंपरचाकाला थांबायला भाग पाडले. पोलिसांनी त्याला साईड का देत नव्हता असे विचारल्यावरुन त्यांच्यात वाद झाला.

त्यावेळी रस्त्याच्या कामावरील मजूर जमा झाले. पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत, असे सांगून आयकार्ड दाखविण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत मोठा जमाव गोळा झाला होता. पोलीस असले म्हणून काय झाले. कशावरुन तुम्ही पोलीस, रस्त्यात कोणालाही दमदाटी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का असे म्हणत त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी जमावातील काही जणांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक एंडे यांचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कारच्या काचा फोडण्यात आल्या.

या घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मारहाण करणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षकांचा गळा दाबून खुन करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच दंगल माजविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार सतीश धावडे यांच्यासह ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्याला याबाबत कोणीही काही कळविले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच खेड पोलीस ठाण्याचा टेलिफोन व व्हाटसअ‍ॅप नंबरही बंद असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
आमच्या मजूरांना पोलिसांनी मारहाण करुनही आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो, हाच का पोलिसांचा न्याय ? असा सवाल धावडे यांनी केला आहे. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.