IND vs AUS : खेळाडूंनी बांधल्या काळ्या फिती कारण…

सिडनी : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले होते. मात्र दोन्ही संघांचे काळ्या फिती बांधण्याचे कारण वेगळे वेगळे होते.

या कारणाने खेळाडूंनी बांधल्या काळ्या फिती – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे लहानपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे काल मुंबईतील निधन झाले. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, अजित आगरकर, बलविंदर सिंह संधू, संजय बांगर यांच्यासारख्या अनेक खेळाडूंची कारकिर्द आचरेकर सरांनी आपल्या हाताने घडवली. अशा महान खेळाडूंना घडवणाऱ्या गुरूंसाठी भारतीय संघाने चौथ्या कसोटीत काळ्या पट्ट्या बांधून श्रद्धांजली वाहिली.

३१ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बिल वॉटसन यांचे निधन झाले. ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही काळ्या फिती दंडावर बांधून मैदानात उतरले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत ट्विट केले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी स्विकारली.पहिल्या दिवसाच्या संपूर्ण खेळावर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. पुजाराने मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शतकवीर पुजारा १३०, तर हनुमा विहारी ३९ धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने दोन बळी घेतले. नॅथन लायन आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऐतिहासिक मालिका विजयाची संधी भारतीय संघाजवळ आहे.