सावधान…! बॉयलर कोंबडीचे चिकन खाताय ? प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हल्ली बॉयलर कोंबड्यांच्या चिकनला चांगली मागणी आहे. घराघरात हे चिकन खाल्ले जाते पण या कोंबड्यांची चांगली वाढ होण्यासाठी भारतातील पोल्ट्री चालकांकडून धोकादायक ‘कॉलिस्टीन’ हे प्रतिजैवक (एंटी बायोटिक) सर्रास वापरले जात असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. लंडनमधील ‘ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम’ यांनी भारतात एक शोध मोहिम राबवली त्यात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर सावध झालेल्या केंद्र सरकारने ‘कॉलिस्टीन’ वर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘कॉलिस्टीन’ चा वापर कोणत्याही कारणांसाठी करू नये अशा सूचना सरकारने दिल्यानंतर त्याचा वापर होत असल्याने सरकारने बंदीचा प्रस्ताव आणणार आहे.
लस देऊन वाढवल्या जातात कोंबड्या 
जनावरांची व्यवस्थित व चांगली वाढ होण्यासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रात ‘कॉलिस्टीन’ ची लस दिली जाते. आजारी रूग्णांवरही याचा वापर केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात पोल्ट्री व्यवसायात याचा भरमसाठ वापर होत असल्याचे समोर आले आहे. चिकनची मागणी मोठी असल्याने भारतातील पोल्ट्री व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. झटपट व कमी खर्चात अधिक नफा कमविण्यासाठी कुक्कुटपालन करणारे व्यायसायिक व कंपन्या पोल्ट्री चालकांना कॉलिस्टीन उपलब्ध करून देत असल्याचे लंडनमधील ‘ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम’ ने शोधपत्रकारितेद्वारे पुढे आणले आहे.
वेंकीज कंपनीची  कॉलिस्टीनचा वापर करत असल्याची कबुली
तीन महिन्यात तयार होणारी बॉयलर कोंबडी कॉलिस्टीन दिल्याने २ महिन्यांत तयार होते. ज्यामुळे पोल्ट्री चालकांचा मोठा फायदा होतो. मात्र, कॉलिस्टीनयुक्त चिकन आरोग्यासाठी धोकादायक असते. भारतातील चिकन पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी असा नावलैकिक असणा-या वेंकीज कंपनीने कॉलिस्टीनचा वापर करत असल्याची कबुली दिल्याचे या तपास मोहिमेत आढळून आले आहे. मॅकडोनाल्ड, केएफसी, पिझ्झाहट यासारख्या फुडचेन्सला वेंकीज कंपनीच बॉयलर कोंबडीचे मांस पुरवते.
युरोपसह चीन, मलेशियात ‘कॉलिस्टीन’वर बंदी
मानवी शरीरासाठी कॉलिस्टीन धोकादायक असल्याने युरोपीय महासंघाने २००६ सालीच यावर बंदी घातली आहे. चीन आणि मलेशियासारख्या देशांनीही २०१८ मध्ये वैद्यकीय क्षेत्रासह पोल्ट्री व्यवसायिक वापरावर कॉलिस्टीनवर बंदी घातली आहे.
वैद्यकीय क्षेत्राची अडचण
दरम्यान, कॉलिस्टीन हे एंटी बायोटिक औषध शेवटच्या स्टेजला असणा-या रूग्णांसाठी उपयुक्त मानले जाते. शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टर पेशंटला कॉलिस्टीनचा डोस देतात. मात्र, आता केंद्र सरकार विविध धोके निर्माण झाल्याने यावर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. कॉलिस्टीन सर्वसामान्यांसाठी धोकादायक असले तरी रूग्णांना उपयुक्त असल्याने वैद्यकीय क्षेत्राची संभाव्य बंदीमुळे अडचण होऊ शकते.