सावधान… कामचुकारपणा कराल तर पोलीस आयुक्तांच्या कारवाईला सामोरे जा..

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कामचुकार पोलीस ही पोलीस खात्याला लागलेली किडच आहे. यातच वाहतूक पोलीस म्हटले की आणखी त्यात भर. चौकात वाहतूक नियमनासाठी नेमणूक असताना हे पोलीस इकडे तिकडे फिरताना अनेकदा दिसतात. मात्र असेच दोन वाहतूक पोलीस पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले.

चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करण्याचे सोडून आपापसात गप्पा मारत बसलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी कवायत करण्याची शिक्षा दिली. आयुक्तानी सर्वासमोर अशा प्रकारे दिलेल्या शिक्षेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

वाहतूक पोलिसांना आयुक्तालयात कवायतीची शिक्षा

पोलीस आयुक्त पद्मनाभन हे त्यांच्या वाहनातून चिंचवड स्टेशन येथून निघाले असताना तेथील चौकामध्ये दोन वाहतूक पोलीस कर्तव्यावर असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, वाहतूक नियमनाचे काम न करता चौकामध्ये एका बाजूला थांबून ते गप्पा मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. चिंचवड स्टेशनसारख्या व्यस्त चौकामध्ये वाहतुकीचे योग्य नियमन आवश्यक आहे. असे असतानाही कामचुकारपणा केला जात असल्याने पोलीस आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना आयुक्त कार्यालयात बोलावून घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. वाहतूक पोलिसांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे लक्षात आल्यानंतर अ‍ॅटोक्लस्टर येथील आयुक्त कार्यालयाच्या समोर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना कवायत करण्याची शिक्षा दिली. या वेळी इतर पोलीस कर्मचारीही आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित होते. आयुक्तांच्या अशा प्रकारच्या अनोख्या शिक्षेमुळे कामचुकार पोलीस कर्मचारी ओशाळले होते. उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याच सहकाऱ्यांना दिलेली शिक्षा डोळ्याने पाहिल्याने आयुक्तांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य केले पाहिजे. कामचुकारपणा आणि चुकीचे काम करणारांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.