संभाव्य धोके टाळण्यासाठी सज्ज राहा : पोलीस महासंचालक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आतंकवाद आणि नक्षलवाद यांसारख्या संघटनांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने उपनिरीक्षक पदावर विराजमान झालेल्या अधिकाऱ्यांनी आपला पूर्वानुभव आणि प्रशिक्षणात मिळालेल्या अनुभवाची सांगड घालत कुठल्याही संकटावर मात करावी. तसेच, सर्वसामान्यांमध्ये पोलीस दलाची उज्ज्वल प्रतिमा कायम ठेवून गुन्हेगारी मोडीत काढावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या वतीने ११६ व्या सत्रातील १७५ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या तुकडीचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षान्त संचलन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय सक्‍सेना, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालिका अस्वस्ती दोरजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक संजय दराडे उपस्थित होते. प्रारंभी खात्याअंतर्गत स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या १७५ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी शानदार संचलन केले. यावेळी महासंचालक पडसलगीकर यांच्या हस्ते विविध पदकांचे वितरण करण्यात आले. या तुकडीत १४५ पुरुष व सात महिला असे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, तर २३ सागरी सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकांचा समावेश होता. अस्वती दोरजे यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ दिली.

देशपातळीवरील या संस्थेत अनेक अधिकारी घडले आहेत. पोलीस अकादमीने सतत नावीन्य राखले असून, या तुकडीपासून ॲम्बीस या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. कुठलाही तपास करताना ॲम्बीस या ठसे आणि डोळ्यांच्या तपासणीच्या माध्यमातून गुह्याचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे अस्वती दोरजे म्हणाल्या.

महासंचालक पडसलगीकर म्हणाले की, कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी. कुठल्याही आव्हानाला सामोरे जाताना पोलीस दलातील पूर्वानुभव आणि प्रशिक्षणातून मिळलेल्या शिकवणीची सांगड घालावी. यावेळी त्यांनी समाजासमोर ‘मॉडेल’ पोलिसिंग उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. अकादमीतून अधिकारी दजार्चे प्रशिक्षण दिल्यामुळे राष्ट्र आणि राज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलण्यात यशस्वी व्हालच. परंतु, ते करीत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. सागरी दलाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी काही टिप्स दिल्या. तसेच आबालवृद्धांसह पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना चांगली वागणूक देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. यावेळी तुकडीमधील चैताली गपाट यांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावून महिलाही कमी नाहीत, हे सिद्ध करून दाखविले. त्याचा पोलीस दलास अभिमान असल्याचेही पडसलगीकर यावेळी म्हणाले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.