तो दानशूर डॉक्टर करणार गरीब रुग्णांवर ‘मोफत अँजिओप्लास्टी’

बंगळुरू : वृत्तसंस्था – आता लवकरच गरिब रुग्णांसाठी खर्चिक असलेली  अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात मोफत करण्यात येणार आहे. बंगळुरू येथील सेंट. जॉन्स हॉस्पीटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. किरोन व्हर्गेसे यांनी गरीब रुग्णांवर मोफत अँजिओप्लास्टी करणार असल्याचे परिपत्रकच जारी केले आहे. दररोज एक याप्रमाणे 30 रुग्णांवर ही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे हे विशेष. गरिब रुग्णांसाठी आता याचा मोठा फायदा होणार आहे.
याबाबत बोलताना डॉ. किरोन व्हर्गेसे म्हणाले की, “जे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उत्तम शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब आहे, अशा रुग्णांवर मला मोफत उपचार करायचे आहेत.” व्हर्गेसे हे एकूण 30 अँजिओप्लासाटी शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यासाठी काही मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी पैशांची मदत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यातील 15 तारखेला या मोफत शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात करण्यात आली असून 15 फेब्रुवारीपर्यंत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे जे रुग्ण तरुण आहेत किंवा कुटुंबातील कमावते आहेत त्यांना या शस्त्रक्रियेसाठी प्राधान्य मिळणार आहे.
साधारणपणे अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जर तुम्ही खासगी रुग्णालयात दाखल झालात तर तुम्हाला 1-2 लाख रुपयांचा खर्च येतो. वयवर्षे 40 ते 60 वर्षांच्या व्यक्तींवर अधिक प्रमाणात ही शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार सध्या जगभरात ह्रदयरोगाशी संबंधित आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.