‘तो’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : वृत्तसंस्था – पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील काही प्रसंगावर जोशी आणि बडोदेकर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.
या चित्रपटात ‘गानहिरा हिराबाई बडोदेकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी चित्रपटात चुकीचे प्रसंग दाखविण्यात आले असून चित्रपटात वाट्टेल ते दाखविण्यात आले आहे. या अक्षम्य चुकांसाठी चित्रपटकर्त्यांनी जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी हिराबाई बडोदेकर आणि भीमसेन जोशींच्या कुटुंबीयांनी केली आहे.

जीवघेणा हल्ला होऊनही अखेर ‘त्या’ आरोपीस सहायक फौजदाराने (ASI) पकडले  

कलाकारांवरील चित्रीत करण्यात आलेले प्रसंग हीन दर्जाचे आहेत. या महान कलावंतांनी आपल्या कलेमुळे भारतीय अभिजात संगीतात जी मोलाची भर घातली आहे या चित्रपटातील प्रसंगामुळे त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्या पिढीपुढे चुकीचा इतिहास आणून या महान  व्यक्तिमत्त्वांचा अनादर करणारे चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक-निर्माते यांनी या प्रकारची जबाबदारी घेऊन चित्रपटातील चुकीचे प्रसंग काढून टाकावेत आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागावी,’ अशी मागणी पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी, हिराबाई बडोदेकर यांचे नातू निशिकांत बडोदेकर आणि नात व गायिका मीना फातर्पेकर यांनी केली आहे.
पुढील प्रसंगावर नाराजी 
चित्रपटात भीमसेनजी, वसंतराव आणि पुलं हे हिराबाईंच्या घरी दारू पिण्यासाठी जातात, असे दाखविण्यात आले आहे. असे कधीही घडलेच नाही, असे म्हणत या प्रसंगावर आक्षेप घेण्यात आला आहे.
हिराबाई आणि पुलं, भीमसेन यांच्या वयांत एका पिढीचे अंतर होते. मात्र, चित्रपटात हे अंतर कमी दाखविण्यात आले आहे. शिवाय, हिराबाईंचा उल्लेखही एकेरी करण्यात आला आहे, यावर आक्षेप.
चित्रपटात रेखाटलेली भीमसेनजींची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने आल्याने त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
हिराबाई या आमच्या वडिलांसाठी आईसारख्या होत्या. हिराबाईंच्या घरात दारूची बाटली असणे, त्यांच्याकडे दारू प्यायला आमचे वडील जाणे, हे अतिशय चुकीचे आणि असत्य चित्रण चित्रपटात दाखवले आहे. कलात्मकता दाखविण्याच्या नादात ही घोडचूक केली आहे. हे योग्य नाही. आम्ही व्यथित झालो आहोत. असे श्रीनिवास जोशी म्हणाले.