भिडे गुरुजींची न्यायालयात पुन्हा दांडी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – संततीप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा न्यायालयात दांडी मारली आहे. आजारपणामुळे ते उपस्थित राहू शकत नसल्याचे बचाव पक्षातर्फे सांगण्यात आल्याने या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज ७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. याच प्रकरणात भिडे गुरुजी यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर सुनावणी झाली.

माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान भिडे गुरुजी यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यावर कुटुंबकल्याण विभागाच्या लेक लाडकी या वेबसाइटवरून आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तिची दखल घेत आरोग्य विभागाने महापालिकेस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात तथ्य आढळल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते; परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने या संदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. प्रथम वर्ग न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर न्यायालयाने समन्स काढूनही भिडे गैरहजर राहिले.

या खटल्यात संभाजी भिडे यांच्यातर्फे अ‍ॅड. अविनाश भिडे हे दाखल झाले होते. त्यांनी भिडे गुरुजी यांचे वय ८३ वर्षे असून, ते आजारी असल्याने त्यांची सांगलीहून नाशिकमध्ये येण्यासारखी परिस्थिती नसल्याने गैरहजेरी माफ करण्याची विनंती न्यायालयास केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बचाव पक्षाची विनंती मान्य करीत, ७ डिसेंबरपर्यंत कामकाज पुढे ढकलले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या या खटल्यास संभाजी भिडे यांनी वकिलांमार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकार पक्ष व महापालिका यांना नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत.