भुवनेश्वर कुमारने रवी शास्त्रीला टाकले मागे

सिडनी : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात भारताची दमदार सुरुवात झाली असून भारताने तिसऱ्याच षटकात कांगारुंना धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. कसोटी मालिकेत खेळण्याची सधी न मिळालेल्या भुवनेश्वर कुमारने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आसी कर्णधार अ‍ॅरोन फिंचचा त्रिफळा उडवला आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एका विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले.

फिंचच्या विकेटसह भुवनेश्वरने वन डे क्रिकेटमध्ये विकेटचे शतक साजरे केले. त्याला पहिले अर्धशतक साजरे करण्यासाठी ४९ डाव खेळावे लागले, दुसऱ्या ५० विकेट्स त्याने ४७ डावांत घेतल्या. या कामगिरीसह त्याने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मागे टाकले. भुवनेश्वरने ९६ डावांत शंभर विकेट घेतल्या. शास्त्रींना १०० विकेट घेण्यासाठी १०० डाव खेळावे लागले होते. वेंकटेश प्रसाद व रवींद्र जडेजा यांनी ८५ डावांत १०० विकेट घेतल्या होत्या.
फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०१८ पासून झालेल्या २३ वन डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये चांगल्या कामगिरीचे त्यांचे लक्ष्य आहे. मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनेही त्यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पण, सामन्याच्या तिसऱ्याच षटकात फिंच माघारी परतला. भुवनेश्वरने त्याचा त्रिफळा उडवत कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदिप यादवने दुसरा धक्का दिला. हाणामारीच्या पहिल्या १५ षटकात आॅस्टेलियाला बऱ्यापैकी रोखण्यात भारताला यश आले आहे.