जरा हटके

पुण्यात पर्यावरणपूरक ‘बायसिकल बस’ची निर्मिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. पण आता काळाच्या ओघात सायकलींची जागा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांनी घेतली आहे. शहरात आता वाहनांची संख्या इतकी झाली आहे की, शहराला ट्रॅफिकची मोठी समस्या भेडसावत आहे. पुण्यातल्या एका सुज्ञ नागरिकाने पुन्हा एकदा  सायकलींना महत्व आणून दिले आहे. पुण्यातील मिलिंद कुलकर्णी यांनी पर्यावरणपूरक ‘बायसिकल बस’ निर्माण केली आहे. परदेशात अशा प्रकारच्या ‘बायसिकल बस’ आहेत पण भारतात अशा प्रकारची वाहने अद्याप रस्त्यावर धावत नाहीत. अगदी कमी खर्चात आणि कमी साहित्यात या प्रायोगिक तत्वावर असलेल्या मॉडेलची निर्मिती पुण्यात झाली आहे.
या बसविषयी सांगताना कुलकर्णी म्हणाले, सायकलिंगला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी ही बस तयार केली आहे. बायसिकल बस ही संकल्पना सध्या प्रगत देशात पाहायला मिळते. परंतु, आपल्या देशात मात्र आजही सायकल चालवणे कमीपणाचे वाटते. परंतु, प्रगत देशात आजही मोठ्या हुद्द्यावरील नागरिकही सायकल चालविताना दिसतात. त्यामुळे सायकल चालविणे म्हणजे कमीपणाचे, ही ओळख मिटवून टाकण्यासाठी ही ‘बायसिकल बस’ तयार केल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील नऱ्हे भागात असलेल्या वर्कशॉपमध्ये त्यांनी महिनाभरात ही बस तयार केली.
काय आहेत ‘बायसिकल बस’ ची वैशिष्ट्ये 
–ही बायसिकल बस पर्यावरणपूरक आहे.
–या बसमध्ये एकाचवेळी चालकासह ९ जण बसू शकतात.
–बसची रचना सायकल सारखी आहे.
–ही बस स्कुलबस म्हणून वापरता येईल.
–विकेंडचे औचित्य साधून जे सायकलिस्ट ग्रुप लांब फिरायला जातात, त्यांच्यासाठी ही बायसिकल बस उपयोगी पडू शकते.
–मोठमोठ्या पार्कमध्येही बस उपयोगी पडू शकेल.
–जंगल सफारीमध्ये या बसचा चांगला वापर होऊ शकतो.
–सायकल चालवण्याचा आनंद आणि उत्तम आरोग्यही मिळेल
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविताना अनेक अडचणी निर्माण होतात. या अडचणींवर तोडगा काढण्याचा शक्य तो प्रयत्न पुणेकर करत असतात. मिलिंद कुलकर्णी यांनीही असाच प्रयत्न करताना हे आगळे वेगळे वाहन तयार केले आहे. या बसमध्ये बसल्यानंतर एकाच वेळी सायकल, मोटरसायकल आणि कारमध्ये बसल्याचा आनंद घेता येईल. सध्या ही बस प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आली आहे. पण भविष्यात अशा बस पुण्यातील रस्त्यावर धावताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या