क्राईम स्टोरी

कोट्यावधी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी पुण्यातील बड्या बिल्डरला अटक

मार्वल कायरा स्कीमच्या झंवर बिल्डरला अटक : इतर 4 बिल्डरविरूध्द फसवणुकीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- ग्राहकांच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये बदल करून तसेच पुणे महानगरपालिकेचा मंजुर नसलेला खोटा प्लॅन लावुन तो खरा असल्याचे दाखवुन खरेदीखताच्या दस्तमध्ये वापर करून कोटयावधी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शहरातील एका बड्या बिल्डरला अटक केली आहे. हडपसर पोलिसांच्या या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. फ्लॅट नंबर 1201, मार्कल औरम लेन नंबर 7, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. त्याच्यासह कार्तिक धनशेखरन (36, रा. विमाननगर), संजय जस्सुभाई देसाई आणि प्रमोद तुकाराम मगर यांच्याविरूध्द भादंवि 420, 406, 409, 465, 467, 478, 471, 474, 120 (ब), 34, मोफा कायदा कलम 3,4,5,8 आणि 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून दुसरी फिर्याद मुकेश यांचे भाऊ नवीन मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) यांनी दिली आहे.

फिर्यादी मनसुखानी यांनी विश्‍वजित झंवर, कार्तिक धनशेखरन, संजय देसाई, प्रमोद मगर आणि इतरांच्या मार्वल कायरा बांधकाम स्कीम स.नं. 134/2/1 व 2/2ए व 2बी/2 व 3 ए व 3 बी व 4 मगरटपट्टा (हडपसर) येथे बी विंग मधील 12 व्या मजल्यावरील 1201 डुप्लेक्स व सर्वात मोठा फ्लॅट व त्याच बरोबर 12 व्या मजल्यावर स्काय रेस्टॉरंट व 16 व्या मजल्यावर जिम अशी सुविधा असलेला व त्याचे एकुण क्षेत्रफळ 644.74 चौरस मिटर बिल्टअप एरिया 79.89 चौरस मिटर व ओपन टेरेस व दोन कार पार्किंग असा असलेला फ्लॅट आणि इतर गोष्टी दि. 5 नोव्हेंबर 2014 रोजी 5 लाख रूपये आरटीजीएस व्दारे देवुन बुक केला होता. दि. 4 एप्रिल 2015 रोजी सदर फ्लॅटचे रजिस्टर खरेदीखत केले. दि. 30 जून 2017 रोजी नंबर फिर्यादी यांनी वेळावेळी अटक आरोपी विश्‍वजित झंवर व पाहिजे असलेल्या आरोपींना फोन व ई-मेल करून फ्लॅटच्या ताब्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांनी फिर्यादी मनसुखानी यांना उडवाउडवीची उत्‍तरे दिली. त्यामुळे फिर्यादी यांना शंका आली. त्यांनी भारतात येवुन आरोपींच्या कार्यालयावर जावुन व मगरपट्टा येथील मार्वल कायरा स्कीमच्या बांधकाम साईटवर जावुन खात्री केली असता त्यावेळी त्यांना फक्‍त दोन बिल्डींगचे अर्धवट आरसीसी बांधकाम झाल्याचे दिसले.

खरेदीखताप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे दिसल्याने त्यांनी बिल्डर झंवर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी झंवरने केवळ दोन बिल्डींगचे काम करणार असल्याचे सांगुन तिसर्‍या बिल्डींगचे काम करणार नसल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये बदल करून फिर्यादी व इतरांना फसविण्याचा कट रचला. फिर्यादी यांच्याकडून वेळावेळी 1 कोटी 82 लाख 46 हजार 180 रूपये घेवुन त्या पैशाचा दुसरीकडे वापर केला. फिर्यादीचे भाऊ नवीन मनसुखानी यांच्याकडून देखील 1 कोटी 85 लाख 58 हजार 986 रूपये घेतले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत. विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. फ्लॅट नंबर 1201, मार्कल औरम लेन नंबर 7, कोरेगाव पार्क) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने बिल्डर झंवरला दि. 16 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

टीप :- शहरातील काही गुंतवणुकदारांची मार्वल बिल्डरच्या मगरपट्टा येथील मार्वल कायरा या स्कीममध्ये फसवणुक झाली असल्यास संबंधितांनी तक्रार नोंदविण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांच्याकडे हडपसर पोलिस ठाण्यात येवुन तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या