पुण्यात भीषण आग ; दुकाने जळाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बालेवाडी फाटा येथे चाकणकर मळा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दुकानांमध्ये बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत एकमेकांना लागून असलेले हॉटेल, गॅरेज, ऑईलचे दुकान पुर्णपणे जळाले तर पाठीमागे असलेल्या घरातील काही साहित्य जळून खाक झाले. तर हॉटेलमध्ये एका सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या कोथरुड, पाषाण, औंध केंद्रांच्या फायरगाड्यांच्या एक तासाच्या परिश्रमांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी किंवा कोणी जखमी झाले नाही.

अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पात्रुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी फाटा येथील चाकणकर मळा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये, फॅब्रिकेशनचे दुकान, स्वराज हॉटेल, ऑईलचे दुकान, गॅरेज, आणि त्याशेजारी होंडाचे शोरूम आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास येथील एका दुकानात अचानक आग लागली. त्यावेळी दुकानाच्या मागेच राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या कोथरुड, पाषाण आणि औंध येथील फायरगाड्या तात्काळ तेथे दाखल झाल्या. त्यावेळी स्वराज हॉटेलमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तेथील फुटण्याच्या स्थितीत असलेल्या एक, तर अजून तीन सिलेंडर बाहेर काढले. त्यानंतर पत्र्याच्या शेडचे पत्रे वाकवून त्यांनी पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. काही वेळातच आग आटोक्यात आणली. परंतु स्वराज हॉटेलमधील सर्व फर्निचर, गॅरेजमधील वीस दुचाकी व इतर साहित्य आणि त्यांच्याच पाठीमागे असलेले शिंदे यांच्या घरातील काही साहित्य या घटनेत जळून खाक झाले. तर शेजारीच असलेल्या शोरुमला या आगीची झळ बसली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.