यंदा लोणावळ्यात नाही तर ‘या’ ठिकाणी असेल ‘बिग बॉस मराठी’चं घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘बिग बॉस मराठी’च दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वामध्ये शोची जितकी चर्चा झाली तितकेच कौतुक झाले ते ‘बिग बॉस’च्या सेटचे. मात्र ह्या वेळेस बिग बॉसचं घर बदललं आहे. आता मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये ‘बिग बॉस’चा सेट उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या कारणामुळे बदलली जागा –

हिंदी ‘बिग बॉस’ प्रमाणेच मराठी ‘बिग बॉस’चा सेट देखील लोणावळ्यात उभा करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण हे मुंबईत होणार अशी चर्चा आहे. याआधी मल्याळम ‘बिग बॉस’चे चित्रीकरण फिल्म सिटीमध्ये झाले होते. मुंबईत चित्रीकरण करणे शोच्या दृष्टीनं सोयीचं पडणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शोमध्ये ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दिसणार असल्याचीही देखील जोरदार चर्चा सुरु आहे.

‘बिग बॉस मराठी’च पहिल पर्व जेवढं लोकप्रिय ठरलं तेवढंच ते वादग्रस्तही राहीलं. महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. बिग बॉस मराठीच पहिल पर्व मागील वर्षी १५ एप्रिलपासून सुरु झाले होते. ते पर्व ९० एपिसोड्सचे होते. पहिल्या पर्वात उषा नाडकर्णी, जुई गडकरी, सुशांत शेलार, विनीत बोंडे, भूषण कडू, अनिल थत्ते, सई लोकूर, आस्ताद काळे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, मेघा धाडे यांसारख्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती.