भाजप मंदिर-मस्जिदीचा मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत : छगन भुजबळ

उल्हासनगर : पाेलीसनामा ऑनलाईन- विकासाचा मुद्दा बाजुला ठेवुन भाजप सरकार मंदिर – मस्जिदचा मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटत आहे की यामध्ये सुशिक्षित लोक आंधळे बनत चालले आहेत. हा निवडणुक जुमला असून याकडे लक्ष देवू नका असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी उल्हासनगर येथील जाहीर सभेत केले.

यांना मंदिर नाही बनवायचे तर सरकार बनवायचे आहे. म्हणून मंदिराचा मुद्दा घेवून मंदिर मस्जिदीचा मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे. असा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला. आमचा राजा जास्त उदार झाला आहे. परंतु पुन्हा फसलात तर लक्षात ठेवा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आता यांचे अच्छे दिन कमी उरले आहेत असेही आमदार छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आपल्या सोबत मन की बात आणि अदानी – अंबानी सोबत धन की बात असे बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातची माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली. आज देशावर अशा लोकांचे राज्य आहे जे लोक आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टिकाही छगन भुजबळ यांनी केली.

ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी या जाहीर सभेत पुन्हा एकदा भाजप मोदी आणि सेना त्यांच्या कारभारावर शरसंधान साधले. काळा पैसा सापडला नाही परंतु नोटबंदीमध्ये गोरगरीब यामध्ये मरण पावले. कुठाय दहशतवाद संपला. कुठाय काळापैसा असा सवालही छगन भुजबळ यांनी सरकारला केला.

ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला. असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. आम्ही हरलो परंतु आमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे की आम्ही पुन्हा सत्तेत येणार हे नक्की आहे असा विश्वासही आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

भाजप सरकार बदलण्यासाठीच राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा – जयंतराव पाटील
देश आणि राज्यातील भाजप सरकार बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन संपर्क यात्रा काढण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उल्हासनगर येथील सभेत दिली.

आमदार जयंतराव पाटील यांनी भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि मंत्र्यांचे घोटाळे व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने याची माहिती व्हिडिओ क्लिप दाखवून जोरदार प्रहार केला.

भाजपने महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याऐवजी भ्रष्टाचारयुक्त केला – धनंजय मुंडे
भाजप सरकारला चार वर्षे झाली सत्तेत येवून परंतु भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याऐवजी उलट महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उल्हासनगर मधील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांवर केला.

महागाईने आज डोकं वर काढलं आहे. २०१४ पासून आजपर्यंत मोदींनी पेट्रोल च्या दरवाढीने ३१ रुपयांची लूट केली आहे. तुमच्या मनात फसवणूक करणाऱ्या या सरकार बद्दल चीड, संताप असेल तर हा संताप येत्या निवडणुकीत दाखवून द्या असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

निवडणुकीत आता वेगवेगळी आश्वासने दिली जातील. या आश्वासनांना बळी पडू नका असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.
किती दिवस जनतेला फसवणार आहात. भाजपकडे विकासाचा मुद्दा नसतो त्यावेळी रामाचा मुद्दा घेतात परंतु ज्यावेळी घेतात त्यावेळी त्यांना वनवासामध्ये जावे लागते असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

चार वर्षात महाराष्ट्र लुटला आहात त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले.

या सभेत आमदार ज्योती कलानी, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे ,राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यांनी आपले विचार मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार ज्योती कलानी, माजी खासदार संजीव नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,आदींसह उल्हासनगर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.