राजकीय

‘राजकारणात गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली’

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात अलीकडे गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पक्षाची बदनामी होते असे वक्तव्य माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे. विकासाचे राजकारण केले, तरच लोक तुम्हाला निवडून देतात असे सांगत राजकारणात स्वार्थीपणा वाढला आहे, अशी खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. शिवाय खानदेशात धरणांसह सिंचन प्रकल्प आपल्या कालखंडात मंजूर झाले. तीच कामे आज सुरू आहेत असेही ते म्हणाले.

पिंपरखेड तांडा (ता. चाळीसगाव) येथील आश्रमशाळेच्या आवारात भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वाडीलाल राठोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, “गेली अनेक वर्षे पक्षाच्या खस्ता खाल्ल्या. अनेक कार्यकर्ते अन्‌ नेते घडविले. अनेक कार्यकर्ते चांगल्या पदावर पोहोचले; परंतु त्यांनी नंतर साथ सोडली. राजकारणात स्वार्थी वृत्ती वाढली आहे. सूडबुद्धीचे राजकारण होत आहे. राजकारणात अलीकडे गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पक्षाची बदनामी होते. पक्षातील नव्या लोकांना जुने कालबाह्य वाटतात; परंतु जुन्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचा विस्तार झाला.”

भाजपमध्ये इतरांपेक्षा वेगळे असावे, असे शिकविले जात असल्याचे सांगत आमदार खडसे यांनी आमदार उन्मेष पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले पाहिजे. बेलगंगा कारखान्याचा निवडणुकीसाठी वापर करण्यात आला. निवडून द्या, कारखाना सुरू करू, असे सांगितले. मात्र, निवडून आल्यानंतर कारखान्याचा विसर पडला.”

यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. खासदार ए. टी. पाटील, माजी मंत्री एम. के. पाटील, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, राजीव देशमुख, डॉ. बी. एस. पाटील, अनिल भाईदास पाटील (अमळनेर), जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, उदेसिंग (अण्णा) पवार, ज्ञानेश्वर माऊली, चित्रसेन पाटील, जी. जी. चव्हाण, पोपट भोळे, सभापती रवींद्र पाटील, कवी मनोहर आंधळे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेश राठोड व्यासपीठावर होते.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या