ज्यांना राजकारणात मोठे केले तेच माझी साथ सोडून गेले

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाईन – विकासाचे राजकारण केले तरच लोक तुम्हाला निवडून देतात अन्यथा लोक तुमचा पराभव करायला मागे पुढे बघत नाहीत. माझ्या कार्यकाळात ज्या योजनांना मी मंजुरी दिली त्याच योजनांची कामे सध्या सुरु आहेत. परंतु आता राजकारणात स्वार्थ वाढत चालला आहे अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरखेड तांडा (ता. चाळीसगाव) येथील आश्रमशाळेच्या परिसरात भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वाडीलाल राठोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण एकनाथ खडसे यांच्या हस्ते झाले त्यावेळी खडसे बोलत होते. खासदार ए. टी. पाटील, माजी मंत्री एम. के. पाटील, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, राजीव देशमुख, डॉ. बी. एस. पाटील, अनिल भाईदास पाटील, प्रमोद पाटील, उदेसिंग पवार, ज्ञानेश्वर माऊली, चित्रसेन पाटील, जी. जी. चव्हाण, पोपट भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मागचे अनेक वर्षे पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्याच प्रमाणे अनेक नेते मी या राजकीय वाटचालीत घडवले आहेत. मात्र त्या नेत्यांनी आता माझी साथ सोडली आहे. राजकारणात सध्या स्वार्थी वृत्ती वाढली आहे. सूडबुद्धीने राजकारण खूप वाढले आहे. राजकारणात अलीकडे गुटखा, वाळू तस्कर आणि अंमली पदार्थाच्या तस्करांना हि आता मोठे स्थान मिळू लागले आहे. अशा लोकांमुळे राजकारण बदनाम होत चालले आहे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.