गिफ्ट शॉपी की वेपन शॉपी ? भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. कल्याण गुन्हे शाखेने या पदाधिकाऱ्याच्या दुकानावर धाड टाकून तब्बल १८० प्रकारची शस्त्रे जप्त केली आहेत. धनंजय कुलकर्णी असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून ते भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, धनंजय कुलकर्णी यांचे ‘तपस्या फॅशन हाऊस’ नावाचे गिफ्ट शॉप कल्याण येथे आहे. या ठिकाणी शस्त्रास्त्र विक्रीला ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दुकानावर आज सकाळी धाड टाकली. यावेळी पोलिसांना या दुकानात चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे आणि कुऱ्हाडी अशी शस्त्रं सापडली. दरम्यान ही शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळते आहे. जे अजूनच धक्कादायक आहे.

दुकानाचे मालक आणि संशयित आरोपी धनंजय कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. कुलकर्णींनी क्रॉफर्ड मार्केटमधून हे साहित्य विकत आणल्याची माहिती आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे कुलकर्णींची पोलिस कोठडी मागितली आहे. या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कल्याण पोलीस करीत आहेत.