मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला महाआघाडीचे शक्तिप्रदर्शन ,फुंकणार लोकसभेचे रणशिंग?

जयपूर : वृत्तसंस्था :नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यात काँग्रेसचा विजय झाला.आता येत्या १७ डिसेंबरला राजस्थान आणि मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मातब्बर नेते हजेरी लावणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यापूर्वी कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी देखील काँग्रेस सहित विरोधी पक्ष एकवटले होते. आता पुन्हा तेच चित्र पाहायला मिळणार असे दिसते आहे.
राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. सलग ३ दिवसांच्या ‘मॅरेथॉन’ बैठकीनंतर या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट झाला. त्यानंतर या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी मोठ्या थाटात करण्याचे ठरवण्यात आलेले दिसते.
महाआघाडीचे शक्तिप्रदर्शन 
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आयोजन करण्यात आले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शपथविधीची संधी साधून, महाआघाडीचे शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजप विरोधी पक्षांनी ठरवलेले दिसते. त्यासाठी १७ डिसेंबरला पुन्हा एकदा सर्व पक्षांचे मोठे नेते एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, डीएमके पक्षाचे नेते एम. के. स्टालीन, आरजेडीचे तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव तसेत बसपच्या मायावती आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल या शपथविधीला उपस्थित राहणार आहे.तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या कौटुंबिक कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांच्याऐवजी प्रतिनिधी हजेरी लावणार आहे.