भाजपच्या निलंबित खासदाराची काँग्रेसमध्ये एन्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आझाद यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत पूर्वीच जाहीर केले होते. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश पुढे ढकलला होता. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

किर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली डीडीसीएमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजपने किर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर उघडपणे टीका करण्यास सुरूवात केली. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा जाहीरनाम्यात समावेश करुन देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी खेळ केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

किर्ती आझाद यांच्या बद्दल-

किर्ती आझाद बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते भागवत झा आझाद याचे सुपुत्र आहे. आझाद यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. १९८३ विश्वविजेता संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सरुवात १९९३ मध्ये दिल्लीतील गोल मार्केटतील विधानसभा निवडणुकीतून केली होती. त्यानंतर ते १९९८ मध्ये बिहारकडे वळाले. तिथे त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला. मात्र १९९८ नंतर त्यांना विजयासाठी २००९ सालापर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत सलग तीनदा विजय मिळवला.