प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती अमेरिकेतील रुग्णालयात दाखल

लॉस एंजलिस : वृत्तसंस्था – ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने अमेरिकेतील लॉस एंजलिसमधील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार ते अमेरिकेत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांना २००९ मध्ये लकी या सिनेमातील एक अ‍ॅक्शन सीन करताना दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. याच पाठदुखीवर उपचार करण्यासाठी ते अमेरिकेतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी एक मोठा ब्रेक घेऊन या पाठदुखीवर इलाज केले. पाठदुखीचा त्रास त्यांना जास्त होऊ लागल्याने त्यांनी चित्रपटात काम करणेही सोडले आहे.मिथुन यांनी १९७६ मध्ये आलेल्या मृगया या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९८२ मध्ये आलेला डिस्को डान्सर हा सर्वात हिट सिनेमा ठरला. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही मिथुन लोकप्रिय आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमवेत केलेली अग्निपथ या सिनेमातली भूमिकाही विशेष गाजली. तर गुरु या सिनेमातले त्यांचे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.