प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एटीएस कडून दोघांना अटक

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन – बिहार राज्यातून आलेल्या दोघांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक करुन त्यांच्याकडून पिस्तुल आणि जीवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एटीएसच्या पथकाने दोघांना अटक केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दोघांकडे सांकेतिक शब्दातील एक चिठ्ठी सापडली असल्याचे सुत्रांकडून समजतेय.
पकडण्यात आलेल्या दोघांची नावे कळू शकली नाही.

मात्र, त्यातील एकाचे वय ४३ वर्षे असून तो वडगाव (यवतमाळ) येथील अशोकनगरातील रहिवासी आहे. तर, दुस-याचे वय ४९ वर्षे असून तो लक्ष्मीपूर पोस्ट नवागड, जि. मुंगेर (बिहार) येथील रहिवासी असल्याचे समजते. बिहार येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा घेऊन काही संशयीत नागपूर रेल्वेस्थानकावर येत असल्याची माहिती गुरुवारी (दि.२४) रात्री एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने  रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावला.

बिहारमधून येणाऱ्या रेल्वेगाडी क्रमांक ०७०१० बरोनी- सिकंदराबाद स्पेशल एक्स्प्रेसमधून आलेल्या दोघांना रात्री ८ च्या दरम्यान ताब्यात घेण्यात आले. रेल्वेस्थानकावर यावेळी प्रवाश्यांची मोठी गर्दी असल्यामुळे एटीएसच्या पथकाने त्यांना रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या प्रिपेड आॅटो बूथजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.

या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि २० जीवंत काडतूस आढळले. एटीएसच्या पथकाला त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रात एक कोडवर्डमधील चिठ्ठीही मिळाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या कारवाईची भनक प्रसारमाध्यमांना लागू नये यासाठी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे बिहारमधून गडचिरोली-गोंदियातील नक्षलवाद्यांना ही अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार होते.