६ हजारांची लाच मागणाऱ्या ‘त्या’ वन अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – एका प्रकरणात सहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी इस्लापूरचे वन परिमंडळ अधिकारी शिवप्रसाद मठवाले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लापूर वन परिमंडळातील एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीचे पीक रानडुकरांनी नासधूस केले होते. त्यामुळे या शेतकऱ्याने वन विभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता.

परंतु वन परिमंडळ अधिकारी शिवप्रसाद मठवाले याने पीक नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करुन आणण्यासाठी १० हजार रुपये लाच मागितली. त्यामुळे या शेतकऱ्याने २६ डिसेंबर १८ रोजी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार २७ डिसेंबर १८ रोजी रोजी लाचलुचत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीत लोकसेवक मठवालेने तक्रारदार शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करुन आणून देतो म्हणून १० हजार रुपये मागितले व तडजोडीअंती ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानुसार १० जानेवारी रोजी लोकसेवक शिवप्रसाद मठवाले या वन परिमंडळ अधिकाऱ्याविरुध्द इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाठकर,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक विजय डोंगरे, पो.ना. शेख चाँद, साजीद अली, पोकाँ सुरेश पांचाळ, अंकुश गाडेकर व चालक शिवहार किडे यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपाधीक्षक विजय डोंगरे करीत आहेत.