शिक्षणक्षेत्रात बोकाळली लाचखोरी, ‘त्या’ शिक्षणाधिकाऱ्याची तुरूंगात रवानगी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी संस्थेतील सहायक शिक्षकाच्या पदाला मंजुरी देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर येथील माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी मोहन शशिकांत देसले (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. मोहन देसले हे पूर्वी धुळे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.

खासगी शिक्षण संस्थेत सहायक शिक्षक म्हणून तक्रारदार २०१२ पासून नोकरीला होते. त्यांच्या पदास पालघर येथील माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानुसार तक्रारदार वारंवार शिक्षण विभागात पाठपुरावा करत होते. सहायक शिक्षक या पदास मान्यता देण्यासाठी शिक्षणाधिकारी देसले यांनी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

शिक्षणाधिकारी देसले यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या धुळे शहरातील देवपुरातील रामनगर परिसरात असलेल्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन तास घराची झडती घेतली. रात्री दहा वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.