१ कोटी ७० लाखाचे लाच प्रकरण ; वानखेडेला कोणत्याही क्षणी अटक ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील पर्वती येथील जमिनीसंदर्भात तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकाल दिल्यानंतर वानखेडे यांनी वकिलामर्फत लाच स्विकारली. याप्रकरणात वानखेडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे वानखेडे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या गुन्ह्यात कट रचण्यात सहभागी असल्याने १२० बी हे कलम लावून वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पर्वती येथील जमिनप्रकरणात तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अॅड. रोहित शेंडे याला १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. शेंडे याला २६ डिसेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती. तसेच ज्या संगणकावर हा निकाल टाईप करण्यात आला होता तो संगणक व कार्यालयातील अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बाळासाहेब वानखेडे याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळल्यानंतर वानखेडे फरार झाले आहेत. वनखेडेने उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र, उच्च न्यायालयानेदेखील त्याचा जामीन फेटाळून लावला. त्यामुळे वानखेडे याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
बाळासाहेब वानखेडे याचा अटक पूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.