Thane : नवरीसह करवल्यांची चक्क बुलेट्सवर मंडपात एन्ट्री

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

भिवंडीत हल्ली लग्नामध्ये नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. भिवंडी तालुक्यातील आमणे गावात नवरीने चक्क लग्नमंडपात करवल्यांसह बुलटेवरुन एन्ट्री केल्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी आवाक् झाली.लग्नातील बुलेट्सवरील फोटो व्हायरल झाले असून या लग्नाची चर्चा आता सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे.

प्रणाली विश्वजित केणे (वय २२ वर्ष) असे या नवरीचे नाव असून चैताली विजय खुटले (वय २१ वर्ष) आणि आशिकी किरण पाटील (वय २० पाटील रा. कासार वडवली) अशी करवल्यांची नावे आहेत.

प्रणालीचं लग्न ठाण्यातील योगेश संदीप भोईर या तरुणाशी होते. मंगळवारी (8 मे) सायंकाळी लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडला. लग्नाची वेळ 6.20 वाजता असल्याने भटजीने मंगलाष्टकांना सुरुवात केली. वऱ्हाडींसह पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या आगमनाकडे वळल्या. मात्र प्रणालीने पती योगेशसह वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी बुलेटवरुन एन्ट्री केली. हे दृश्य पाहून सर्वच पाहुणे अवाक् झाले. या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले असून सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने सैराट मधल्या आर्चीची पुन्हा एकदा सर्वांना आठवण झाली.

प्रणालीला लहानपणापासून दुचाकीची चालवण्याची आवड आहे. तिने बी.कॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण करुन बँकिंग डिग्री प्राप्त केली आहे. कल्याणमध्ये महाविद्यालयात शिकत असताना ती बुलेटवरुनच जायची. प्रणालीला तिचा भाऊ विशालने रक्षाबंधनची भेट म्हणून बुलेट दिली होती.