अन् नवरदेवासह अख्खी वरात कोसळली गटारात

नोएडा : वृत्तसंस्था – लग्नाची वरात मंगल कार्यालयाबाहेर आली. वराती बँडच्या तालावर नाचत होते. आणि अचानक गोंधळ उडाला. अख्खी वरातच नवरदेवासह गटारात कोसळली. नोएडा येथे नवरदेवासह ३० ते ४० वराती छोटा पूल कोसळल्याने गटारात पडल्याची घटना घडली. थोडा वेळ गोंधळ झाल्यानंतर, अफरातफर माजल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी शिडी लावून गटारात पडलेल्या वरात्यांना बाहेर काढले.

न्यू कोंडली भागात राहणाऱ्या फुल सिंह यांच्या मुलीचा विवाह इंदिरापुरम येथील अमितशी सेक्टर ५२ मधील ऑलिव्ह गार्डन हॉलमध्ये होणार होता. त्यानंतर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास नवरदेवाला घेऊन वरात परिसरात आली. मंडपाजवळ आल्यानंतर वराती जोशात नाचत होते. ते मंडपाजवळील एका पुलावर आले. तेथे वराती नाचत असताना पुलाला तो भार सहन झाला नाही. त्याचे कमकुवत स्लॅब कोसळले अन् नवरदेवासह अख्खी वरातच गटारात कोसळली.

या सर्व प्रकारात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गटारात पडलेल्यांना शिडी लावून वर काढण्यात आले. शेवटी वरानेही कपडे बदलून लग्न पार पाडले. परंतु वरातींनी प्रचंड गोंधळ घातला. अखेरीस हॉल मालकाने जखमींच्या इलाजाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्यावर गोंधळ शांत झाला.