बीएसएफमधील निकृष्ट जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

रेवाडी : वृत्तसंस्था – लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत असून हा आत्महत्येचा प्रकार असल्याची प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
तेज बहादूर यादव हे रेवाडीतील शांती विहार कॉलनीमध्ये राहत होते. त्यांच्या राहत्या घरी त्यांचा २२ वर्षीय मुलगा रोहितचा मृतदेह आढळला. रोहित दिल्ली विद्यापीठात शिकत असून सुट्टीसाठी तो घरी आला होता. रोहितचे वडिल तेज बहादूर प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. आई ऑफिसवरुन परतल्यानंतर रोहितच्या खोलीची दरवाजा बंद होता. खूप वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी पोलिसांना मदत घेतली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला असता रोहितचा मृतदेह पलंगावर पडलेला दिसला. त्याच्या हातात पिस्तुलही होतं. रोहितच्या हातात सापडलेलं पिस्तुल परवानाप्राप्त होतं की नाही, याबद्दलचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
मूळचे हैदराबादचे रहिवासी असलेले तेज बहादूर यादव त्यांच्या कुटुंबासह रेवाडीत राहतात. बीएसएफमध्ये असताना तेज बहादूर यादव यांनी जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला. यावरुन मोठा वादही निर्माण झाला. याची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली होती. यानंतर शिस्तभंगाप्रकरणी कारवाई करत बीएसएफनं यादव यांना निलंबित केलं.