पेंडीसोबत म्हशीने गिळले पाच तोळ्याचे मंगळसूत्र

खटाव : पोलीसनामा

रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या बहिणीने पेंडीच्या खुराकामध्ये दागिने ठेवले होते. नेहमीप्रमाणे सकाळी म्हशीला पेंडीचा खुराक देण्यात आला. या पेंडीसह सोन्याच्या मंगळसूत्राचाही घास म्हशीने घेतला. वेळीच हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावण्यात आले आणि यशस्वी शस्त्रक्रिया करून गिळलेले मंगळसूत्र सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

[amazon_link asins=’B07313WT89,B00UG9HB1Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3137dfa9-aa79-11e8-9322-313ba5e28048′]

खटाव तालुक्यातील मांडवे गावाजवळील सुनील मांडवे यांच्या बहिण साधना पाटील या रक्षाबंधनाच्या सणासाठी माहेरी आल्या होत्या. रविवारी रात्री झोपताना चोरांच्या भितीने साधना यांनी त्यांचे पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि दीड तोळ्याचे नेकलेस घरातील पेंडीच्या पोत्यात लपवून ठेवले होते. सकाळी सुनील यांनी नेहमीप्रमाणे प्लॅस्टिक टपामध्ये म्हशीला पेंडीचा खुराक दिला. म्हशीने पेंड खाल्यानंतर सुनील यांना टपाच्या तळाशी नेकलेस आढळला. त्यांनी घरात चौकशी केल्यानंतर साधना यांनी मंगळसूत्र आणि नेकलेस पेंडीच्या पोत्यात ठेवल्याचे सांगितले. त्यावरून म्हशीने मंगळसूत्र गिळल्याचा संशय आला. यानंतर तातडीने घटनेची माहिती तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. नितीन खाडे यांना देण्यात आली. डॉ. खाडे यांनी म्हैशीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून सोन्याचे मंगळसूत्र बाहेर काढले. तसेच म्हशीच्या पोटातून त्यांनी प्लास्टिक कागद, टेलिफोन वायर बाहेर काढली. सुमारे दोन ते अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. यावेळी डॉ. खाडे यांना डॉ. तानाजी खाडे, डॉ. प्रकाश बोराटे, यशवंत साबळे यांनी सहकार्य केले.

खटाव तालुक्यातील मांडवे परिसरात चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. याच भितीपोटीच रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या सुनील मांडवे यांची बहिण साधना पाटील यांनी त्यांचे सोन्याचे दागिने पेंडीच्या पोत्यात लपविले होते. परंतु, नजरचुकीने पेंडीसह मंगळसुत्राचा घास म्हशीने घेतला आणि पुढील नाट्य घडले.

नगरमधील रणरागिणींनी बंदी झुगारत घेतले काशीविश्वेश्वराचे दर्शन