८ महानगरांतील बिल्डरांकडे थकले ४ लाख कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महानगर, दिल्ली, एनसीआर, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, बंगळूरु, अहमदाबाद व कोलकाता देशातील आठ मोठ्या शहरांतील बिल्डरांकडे बँका आणि बिगर बँक वित्तीय संस्था यांचे तब्बल ४ लाख कोटी रुपये थकले असल्याची माहिती समोर आली आहे. लियासेस या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली असून त्यांच्या उत्पन्नाच्या हिशेबाने हे कर्ज फेडायला त्यांना सात वर्षे लागतील.

लियासेस संस्थेने देशातील आठ मोठ्या शहरांमधील ११ हजार विकासकांचा अभ्यास करून अहवाल जारी केला. व्यावसायिकांच्या मिळकतीपेक्षा कर्जाचा वार्षिक हप्ता जास्त असल्याने त्यांना हे कर्ज डोईजड झाल्याचे दिसते. व्यावसायिकांच्या कर्जाचा वार्षिक हप्ता १.२८ लाख कोटी रुपये आहे. त्यांची वार्षिक विक्री २.४७ लाख कोटी रुपये आहे. परंतु प्रत्यक्ष मिळकत (व्याज-करपूर्व) अवघी ५७ हजार कोटी रुपये आहे.

त्यात आयएल अँड एफएस या वित्त संस्थेची पडझड व डीएचएफएलची त्याच दिशेने सुरू असलेली वाटचाल यामुळे उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे.

लियासेसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर म्हणाले की, सध्या घरांना मागणी नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसाय विचित्र संकटात सापडला आहे. मागणी वाढविण्यास किमतीत कपात करावी लागेल. अन्यथा व्यावसायिकदृष्ट्या ते शक्य नाही. केवळ १५ टक्के नफा कमवायचा असेल, तर त्यांना सध्याच्या विक्रीत २.६ पट वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे विकासकांची सध्याची स्थिती विहिरीत पडलेल्या हत्तीसारखी झाली आहे. स्वत:च्या बळावर विहिरीतून बाहेर येण्याची क्षमता त्यांच्यात नाही. विहिरीत भराव टाकण्यासाठी त्याला बाह्य मदतीची गरज आहे. बांधकाम व्यावसायिकांची संकटाची विहीर भरण्यासाठी स्वस्त भांडवल मिळायला हवे.