बंदूकीतून चुकून गोळी सुटल्याने पुण्यातील स्विकृत भाजप नगरसेवक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पायात गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गणेश बिडकर हे त्यांच्याकडे असलेली बंदूक साफ करीत असातना बंदूकीतून गोळी सुटल्याने गोळी पायात लागली. ही घटना आज (गुरुवार) दुपारी घडली.

आज दुपारी बिडकर हे त्यांच्याकडे असलेली बंदूक साफ करीत होते. साफ करत असताना मिस फायर होऊन गोळी त्यांच्या पायाला लागली. यामध्ये जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेसंदर्भात पोलिसांकडे संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची कोणतीही खबर आली नसल्याचे समर्थ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिसांनी सांगितले. मात्र, ही घटना घडली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

गणेश बिडकर हे भाजपचे पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष पद भूषवले आहे. २०१७ साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्याचे स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपने पुनर्वसन केले.