चिखलीतील व्यवसायिकाची 95 लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन
कंपनीतील कच्चा माल विकून देतो, असे सांगून एका व्यावसायिकाची 94 लाख 80 हजार 285 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार देहू-आळंदी रोड चिखली येथील सप्तसतिज इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि सप्तसतिज मेटाटेक प्रा. लि. या कंपनीत घडला.

या प्रकरणी लीलाधर जगन्नाथ बराडे (53, रा. शिवतेज नगर, चिंचवड) यांनीचिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश पारेकर, निखिल दत्ता लवटे, प्रमोद बिरादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 सप्टेंबर 2016 ते 22 ऑक्टोबर 2017 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लीलाधर यांची देहू-आळंदी रोडवर चिखली येथे सप्तसतिज नावाची कंपनी आहे. कंपनीतील कच्च्या मालाची डी-कॉयलिंग अँड शेअरिंग प्रक्रिया करून देतो. तसेच कंपनीत अतिरिक्त साठा असलेला कच्चा माल विकून त्याचे पैसे 60 दिवसात देतो, असे सांगून कंपनीतील कच्चा माल घेतला. त्याची खोट्या कंपन्यांच्या नावावर बनावट बिले तयार करण्यास सांगितले. एकूण 94 लाख 80 हजार 285 रुपयांचा अतिरिक्त कच्चा माल घेऊन लीलाधर यांना त्याचा परतावा दिला नाही. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चिखली पोलिस करीत आहेत.