…पण पंतप्रधानांनी घोर निराशा केली : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – “गरीबांच्या घरासाठी तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्ही चांगले मुद्दे मांडलात, पण पंतप्रधानांनी घोर निराशा केली. असो, आम्ही आताही तुमच्या बरोबर आहोत आणि पुन्हा सत्तेवर आल्यावरही तुमच्यासोबत राहू…’ असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माकपचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांना उद्देशून केले. हुतात्मा दिनानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार नरसय्या आडम आणि सुशीलकुमार शिंदे एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात अशी टोलेबाजी झाली. त्यांच्या या वाक्यानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हुतात्मा दिनानिमित्त शिंदे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. राजमाता जिजाऊ व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर शिंदे परत निघाले. त्यावेळी आडम अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी थांबले होते. ते पाहिल्यावर दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर शिंदे यांनी आडम यांच्याशी संवाद साधला.

आडम यांना उद्देशून शिंदे म्हणाले,”तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुमच्या मागणीनुसार पंतप्रधानांनी बॅंक गॅरंटीसंदर्भात घोषणा करणे अपेक्षित होते. तुम्ही चांगला मुद्दा मांडला.” त्यावेळी आडम यांनी “माझी टीका ही भाषणापुरती असते. माझे काम आहे लढणे आणि मी लढत राहणार”, असे उत्तर दिले. त्यानंतर शिंदे म्हणाले,”आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत, आताही आहोत आणि भविष्यात सत्ता आल्यावरही तुमच्यासोबतच राहू.” हे ऐकल्यावर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. चार हुतात्म्यांच्या साक्षीने शिंदे व आडम यांच्यात झालेली भेट भविष्यात काय रंग आणणार हे येणारा काळच सांगेल